नागपूर – भाजपा नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी आमदार श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि शिवाजीराव गर्जे यांनी राम शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला. मनिषा कायंदे आणि अमोल मिटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड केली. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. राम शिंदे यांनी सभापती निवड केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीचे आभार मानले. पक्षाला माझ्यावर विश्वास असल्याने त्यांनी मला ही जबाबदारी द्यायचे ठरवले आहे. या संधीचे मी नक्की सोने करीन, असे राम शिंदे म्हणाले.