मुंबई- कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे राम शिंदे यांच्या पराभावामागे बारामती ॲग्रोचा पैसे आणि गुंड होते असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांविराधोत उमेदवार देण्याची चूक कबूल करण्याचे औदार्य दाखवावे असेही ते म्हणाले. महायुतीच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानत त्यांनी राऊतांनाही खोचक टोला लगावला.
अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावे. या निवडणुकीत खरे किंगमेकर अजितदादाच आहेत. अजितदादांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. तो निर्णय तीनही पक्षांचे नेते एकत्र येऊन घेतील. महाराष्ट्रातील मायबाप जनतेनी आणि विशेषत: लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात इतके यश पाडले की, महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पद शिल्लक ठेवले नाही. याची आम्हाला खंत वाटते.
अजित पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणारे अमोल कोल्हे आज माध्यमांसमोर येऊन लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असे म्हणण्याची धमक का दाखवू शकत नाही? असा सवाल मिटकरी यांनी केला.