राज ठाकरे दुसर्‍यांदा दिल्लीत मनसेही महायुतीत येण्याचे संकेत

नवी दिल्ली – महायुतीमध्ये जागावाटपावरून वाटाघाटी सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुसर्‍यांदा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत त्यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. या भेटीमुळे भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जागावाटपावरून दबावाचे राजकारण करणार्‍या शिंदे-पवारांना शह देण्यासाठी राज ठाकरेंना बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू असावेत असेही बोलले जात आहे.
राज ठाकरे हे आपले चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह आज संध्याकाळी अचानक दिल्लीला रवाना झाले. तर देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला गेले होते. विशेष म्हणजे, गेले काही दिवस महायुतीतील जागावाटपासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दिल्लीच्या फेर्‍या वाढल्या आहेत. परंतु यात आज अचानक राज ठाकरे यांची एंट्री झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यावरून मनसेचाही महायुतीत समावेश होणार असल्याचा तर्क वर्तवला जात आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर या पक्षाने लोकसभेची पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेच्या काही उमेदवारांना लाखाहून अधिक मतेही मिळाली होती. तर विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे 14 आमदार निवडून आले होते. ही वस्तुस्थिती आजही भाजपा नेते विसरलेले नाहीत. मात्र मनसेची परप्रांतीयांच्या विरोधातील भूमिका राष्ट्रीय स्तरावर अडचणीची ठरणारी असल्याने भाजपाने आतापर्यंत मनसेला जवळ केले नव्हते. पण राज्यातील भाजपा नेत्यांच्या राज ठाकरेंशी भेटीगाठी सुरू होत्या. मधल्या काळात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन, मशिदीवरील भोंग्यांना आक्रमकपणे विरोध केला होता. त्यानंतर भाजपा आणि मनसेची जवळीक आणखी वाढली होती. शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीचे सरकार सत्तेवर आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधूनमधून राज ठाकरेंच्या निवासस्थानी जावून त्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यामुळे मनसे-भाजपा युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसेचे काही नेते भाजपा सोबत युती करण्यास अनुकूल असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. राज ठाकरेंची भाजपा आणि मोदींबाबतची भूमिकाही मवाळ झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला सोबत घेण्याबाबत भाजपात विचार सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली.
महाराष्ट्रात मनसेची फार मोठी ताकद नाही. पण मुंबईत बर्‍यापैकी संघटनात्मक ताकद आहे. याउलट महायुतीत असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाची मुंबईत फारशी ताकद नाही. मुंबई महापालिका जिंकायची असेल तर मनसे सोबत असणे गरजेचे आहे, असे काही भाजपा नेत्यांना वाटते. त्यामुळे लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत केल्यास विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला तुमच्या पदरात काही पडेल, त्या दोन्ही निवडणुका आपण एकत्र लढवू असे भाजपाने राज ठाकरेंना सांगितल्याचे कळते. त्यामुळेच मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघांत मनसेची मदत मिळावी यासाठी राज ठाकरेंना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी अमित शहा व जे. पी. नड्डा यांनी चर्चा केल्याचे बोलले जाते.
कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले होते की, मनसे आणि महायुती यांचे विचार सारखे असल्याने भेटीगाठी होतच असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top