राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा!

शेतीचे मोठे नुकसान
मुंबई
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील आंबा, द्राक्ष, पपई, कांदा, मका यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला असून, कल्याण डोंबिवलीत वादळ घोंगावत होते. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात विक्रमी घसरण झाली आहे. नागपूरमध्ये गेल्या तीन दिवसांत कमाल तापमानात १४ अंशांनी घसरण झाली आहे. बुलडाणा, वाशिम, धुळे आणि भंडारा जिल्ह्यांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने केशर आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.