मुंबई – विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनदेखील सरकार स्थापन करण्यास विलंब लावल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपावर सडकून टीका केली. दिल्लीच्या इशाऱ्य़ावर राज्यात सत्ता स्थापनेच्या नावाने डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे,अशा शब्दात राऊत यांनी भाजपावर हल्ला चढवला.
ते म्हणाले की, दिल्लीतून डमरू वाजतो आणि त्या तालावर महाराष्ट्रातील नेते नाचत आहेत. विरोधी पक्ष संपवून टाकायचे भाजपाचे हे षडयंत्र आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती काळजी भाजपावाल्यांना मुळीच नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भांडण लावून आपला कुटील डाव पाडण्याचा मोदी -शहा यांचा प्रयत्न आहे. शिंदेंनी असले प्रयोग करू नयेत. कारण त्यामुळे संविधानच संपुष्टात येण्याची भीती आहे.
अजित पवार यांच्या वारंवार होत असलेल्या दिल्ली भेटींवरही राऊत यांनी शेलक्या शब्दात निशाणा साधला. सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार आहे आणि आमचे नेते दिल्लीत फिरत आहेत. महाराष्ट् याआधी कधीच एवढा लाचार झाल्याचे पाहिले नाही,असेही राऊत म्हणाले.