मुंबई – राज्यात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुन्या या आजारांनी ग्रस्त रुग्ण वर्षभरात सातत्याने वाढताना दिसत आहेत. यंदा इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे.यंदा राज्यात ५७ रुग्णांचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाला आहे.
वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार संसर्गजन्य आजार वाढत असतात. साधारणपणे हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाचे रुग्ण सापडतात.मात्र यंदा संपूर्ण वर्षभर राज्यात इन्फ्लूएंझाचे रुग्ण अधूनमधून सापडत होते. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,राज्यामध्ये १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर या कालावधीत २१ लाख ३३ हजार ६९५ संशयित रुग्ण सापडले, यापैकी दोन हजार ३२४ बाधित रुग्ण सापडले. गेल्यावर्षी याच कालावधीत तीन हजार इन्फ्लूएंझाचे बाधित रुग्ण सापडले होते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी इन्फ्लूएंझामुळे ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र या वर्षी ५७ रुग्णांचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ‘एच१ एन१’ने एका रुग्णाचा, तर ‘एच३ एन२’ने ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. इन्फ्लूएंझाने संशयित असलेल्या जवळपास पाच हजार ७५१ रुग्णांना ओसेलटेमिवीर हे औषध देण्यात आले. ‘एच१ एन१’ आणि ‘एच३ एन२’ या इन्फ्लूएंझाने बाधित २५ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.