राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद

पुणे- राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद असणार आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्‍यात सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. याला राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. ही अंमलबजावणी केल्‍यास राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील १ लाख ८५ हजार विद्यार्थी आणि २९ हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्‍य अंधारात जाण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. त्यामुळे शासनाने हे दोन्‍ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्‍यभरातील सर्व शिक्षक संघटनांनी सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यात झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेतला.