राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणेंचे भलतेच उत्तर

नवी दिल्ली – राज्यसभेत आज कामकाजादरम्यान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची एका प्रश्नाला उत्तर देताना चांगलीच भंबेरी उडाली.सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योग खात्याशी (एमएसएमई) संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र राणे गृहपाठच करून आले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे जे छापील उत्तर होते ते वाचून दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

एमएसएमई क्षेत्रात काम करणार्या कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या भल्यासाठी सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत,असा प्रश्न एका सदस्याने मंत्री नारायण राणे यांना उद्देशून विचारला होता.त्याला उत्तर देताना राणे एमएसएमई क्षेत्राच्या प्रगतीबद्दल माहिती देऊ लागले. त्यांना प्रश्न कळला नसावा असे समजून सभापतींनी त्यांना प्रश्न काय आहे हे हिंदीमध्ये सांगितले. कामगारांच्या कल्याणासाठी काय प्रयत्न केले ते सांगा,असे सभापतींनी राणे यांना सांगितले. मात्र राणे यांच्याकडे तशी काही माहिती बहुधा नसावी, त्यामुळे त्यांनी एमएसएमई क्षेत्राची प्रगती झाली की आपोआप कामगारांचेही भले होईल,असे वेळ मारून नेणारे उत्तर दिले.

नारायण राणे यांच्या या फसगतीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. नारायण राणे यांना प्रश्नच कळला नाही. त्यांनी पुरेसा अभ्यासच केलेला नव्हता हे स्पष्ट दिसले.सभापतींनी त्यांना प्रश्न समजावून सांगितला तरीही ते उत्तर देऊ शकले नाही. राजकारणात नुसती दादागिरी करून चालत नाही. मंत्र्यांनी आपल्या खात्याशी संबंधीत बाबींचा अभ्यास केला पाहिजे,असे म्हणत दमानिया यांनी राणेंवर खोचक टिप्पणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top