नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही.त्यातच आता भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी अधिसूचनाही जारी केली आहे.काल मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की,राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणूक निकालही त्याच दिवशी म्हणजेच २० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
राज्यसभेच्या ज्या सहा जागांसाठी २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे,त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या तीन आणि पश्चिम बंगाल,हरियाणा, ओडिशा आदी राज्यातील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १० डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे, तर १३ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मतदान २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.
दरम्यान,या सर्व ६ जागा विद्यमान खासदारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाल्या आहेत.सध्या राज्यसभेच्या एकूण २५० जागा आहेत. त्यापैकी २३८ जागांसाठी अप्रत्यक्ष निवडणूक होते. तर १२ सदस्य भारताचे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. लोकसभेच्या ४४५ जागांपैकी ४४३ जागांची निवड सार्वजनिक मताद्वारे केली जाते, तर दोन जागांसाठी सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो,परंतु लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.राज्यसभा, संसदेचे वरचे सभागृह कधीही विसर्जित होत नाही, परंतु लोकसभा विसर्जित केली जाऊ शकते.