नवी दिल्ली – वादळी ठरत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज आणखी एक मोठी घटना घडली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिली.
सभापती धनखड अत्यंत पक्षपातीपणे सदनाचे कामकाज चालवतात. त्यामुळे इंडिया आघाडीकडे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यावाचून पर्यायच उरला नाही.अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक होता.परंतु लोकशाहीचे हित जपण्यासाठी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला,असे सिब्बल म्हणाले.
विरोधकांनी संसद सचिवांकडे दाखल केलेल्या या प्रस्तावावर ७० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, द्रमुक आणि राष्ट्रीय जनता दल आदि पक्षांचा त्यात समावेश आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव मंजूर होणार नाही हे निश्चित असले तरी धनखड यांचा पक्षपातीपणा उघड करण्याचा प्रयत्न या प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधकांनी केला आहे.