मुंबई – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे आज सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भगवद् गीता शिक्षा अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, जुहू इस्कॉनचे अध्यक्ष ब्रज हरी दास, पोईसर जिमखानाचे अध्यक्ष मुकेश भंडारी, अमेरिकेच्या टेक्सास चे अटर्नी जनरल कॅन टॅक्सन आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले की, भगवद् गीता हा भारतातील ज्ञान आणि बुद्धीचा उत्कृष्ट ग्रंथ आहे. प्रत्येकाने स्वच्छ मनाने आणि फळाची चिंता न करता एकाग्रतेने आपले कर्तव्य करावे. यशाच्या रूपाने फळ आपोआप मिळेल, असे गीता शिकविते.भगवद् गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद् गीता आपल्याला जगणे शिकविते.
ते पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येकाला शिक्षण, आरोग्य, निवास आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जगातील सर्व प्रगत देशांनी यासाठी प्रयत्न केल्यास चांगली समाज निर्मिती होऊन मानवाचा हॅपिनेस इंडेक्स वाढेल.