राजापूर बाजारपेठेत बिबट्याचा मुक्त संचार

राजापूर- गेल्या काही दिवसांपासून राजापूर शहर परिसरासह बाजारपेठेत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री भर लोकवस्तीत फिरणारा बिबट्याला नागरिकांसह काही वाहनचालकांनीही पाहिला. या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राजापूर शहरवासियांतर्फे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार सामंत यांनीही वनपाल जयराम बावदाने यांना यावर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा राजापूर शहर परिसरात मुक्तपणे संचार सुरू आहे. शहरातील भटाळी,पंचायत समिती परिसर,बाजारपेठ या भागामध्ये बिबट्या बिनधास्तपणे फिरताना दिसला. दोन दिवसांपूर्वी रात्री ११.३० वाजल्यानंतर बाजारपेठेत बिबट्याचे काही लोकांना दर्शन झाले.त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. आज राजापुरात आलेले आमदार सामंत यांची माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी,शिवसेना शहरप्रमुख सौरभ खडपे,महिला आघाडीच्या साजिया काझी गिरकर यांनी भेट घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबतचे लेखी निवेदन दिले. त्याची तत्काळ दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार सामंत यांनी राजापूरचे वनपाल बावदाने यांना दिल्या आहेत.