सावंतवाडी – कोकणातील सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान मंत्री शिंदे गटाचे दीपक केसरकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन तेली आणि भाजपाचे बंडखोर विशाल परब हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीतून विशाल परब यांनी माघार घ्यावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशाल परब यांना फोन केला, त्यावेळी ते परब यांना म्हणाले की, सावंतवाडीत ठाकरे गटाची सीट लागली तरी हरकत नाही. या फोन कॉलची रेकार्डिंग व्हायरल होत असल्याने केसरकर यांच्याबाबतीत फडणवीस पडद्यामागे राजकारण खेळत का, असा प्रश्न विचारला जात आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विशाल परब फडणवीस यांना म्हणतात, मी माघार घेतली तर दीपक केसरकर यांच्याएवजी उबाठाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. यावर फडणवीस त्यांना सांगतात, आली तरी हरकत नाही. त्याची चिंता करू नका. ते आपले आपण पाहू. तुम्ही जाहीर करा की, फडणवीस साहेबांनी आणि (रवींद्र) चव्हाणसाहेबांनी मला म्हटल्याप्रमाणे मला मान्य नसूनही मी माघार घेण्याचा निर्णय घेतो आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की, ते माझे योग्य ते पुनर्वसन करतील. मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. समोरच्यावर उपकारच करायचे, तर पूर्ण केले पाहिजेत. तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही खूप प्रॉमिसिंग पर्सन आहात. आता असे होतेय की, तुमच्यावरील रविचा (चव्हाण) इतका स्टॅम्प आहे की, तो अडचणीत येतो. सगळीकडे रवि अडचणीत येतो. आताच असे म्हटले की, रविने सगळीकडे आपली पॅरलल माणसे उभी केली आहेत. मी त्याला प्रमोट करतो. म्हणून असा गैरसमज पसरतो की, मी त्याला चुकीचे प्रमोट करतो. याचा परिणाम रविवर होतो.