रत्नागिरी – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर या मॅरॅथॉनची सांगता झाली.
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र मतदानाची टक्केवारी कमी असते. म्हणून जिल्ह्यातील मतदान अधिकाधिक व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असेही ते म्हणाले. या वेळी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करून, सर्वांनी मतदानाची शपथ घेतली. कोस्टल मॅरेथॉनचं पथक, सायकल असोसिएशनसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.