रतन टाटांनी ज्यांच्यासाठी 500 कोटींची मालमत्ता सोडली ते मोहिनी मोहन दत्ता कोण आहेत?

Mohini Mohan Dutta :उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांना त्यांच्या साधे राहणीमान व परोपकारासाठी ओळखले जायचे. आता निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्राची चर्चा रंगली आहे. मृत्यूपत्रातील एका अनोळखी नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे नाव आहे जमशेदपूरमधील उद्योजक मोहिनी मोहन दत्ता (Mohini Mohan Dutta) यांचे. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात दत्ता यांना 500 कोटी रुपयांची संपत्ती देण्याचा उल्लेख आहे.

मोहिनी मोहन दत्ता हे टाटा कुटुंबातील सदस्य नाहीत. त्यामुळे मृत्यूपत्रात त्यांचे नाव आल्याने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. रतन टाटा यांनी दत्तांचे नाव मृत्यूपत्रात समाविष्ट करणे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या भावंडांसाठीही काही हिस्सा सोडला आहे. मोहिनी मोहन दत्ता कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात.

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?

मोहिनी मोहन दत्ता व रतन टाटा यांची पहिली भेट 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस झाली. त्यांची पहिली भेट जमशेदपूरमधील डीलर्स’ हॉस्टेलमध्ये झाली, त्या वेळी रतन टाटा अवघे २४ वर्षांचे होते. दत्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले की, टाटा यांची भेट झाल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णतः बदलले. 

दत्ता यांच्या करिअरची सुरुवात टाटा समूहापासूनच झाली आहे. त्यांनी सुरुवातीला टाटा समूहासोबत काम केले. त्यानंतर स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीची स्थापना केली.

2013 मध्ये दत्ता यांची कंपनी ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्याताज सर्व्हिसेस विभागात विलीन झाली. टाटा इंडस्ट्रीजकडे  या व्यवसायातील 80% हिस्सेदारी होती, जी नंतर टाटा कॅपिटलने विकत घेतली व नंतर थॉमस कूक (इंडिया) ला विकली.

सध्या, दत्ता हे TC ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे संचालक आहेत. टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्येही त्यांचे शेअर्स आहेत. टाटा कॅपिटल सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी तयारी करत आहे. दत्ता यांची मुलगीही टाटा समूहाशी जोडलेलीआहे.