नागपूर- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी त्यांची अनधिकृत बांधकामे बुलडोझर चालवून पाडण्याचा सपाटा लावला आहे. हीच कारवाई आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी सतिश भोसले उर्फे ‘खोक्या’च्या घरावर बुलडोझर कारवाई केल्यानंतर आज नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला, तर दुसरा आरोपी युसूफ शेखच्या घरावरही हातोडा कारवाई करण्यात आली.
नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घराचे 900 चौरस फुटांपैकी 300 चौरस फूट बांधकाम हे अतिक्रमित असल्याची नोटीस काल नागपूर महापालिकेने त्याच्या कुटुंबियांना बजावली होती. या नोटिशीतून 23 तासांत घर रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकामे केले होते. हे घर फहीम खानच्या आईच्या नावावर आहे. आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग योजनेअंतर्गत खान कुटुंबाला ही जागा 30 वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 20 मार्चला या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. या घरासाठी कोणताही अधिकृत बांधकाम परवाना मंजूर करण्यात आलेला नसल्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला होता. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास फहीम खान याच्या घरावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी बुलडोझर आणि इतर सामानासह हजर झाले. या कारवाईच्या वेळी परिसरात यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश होता. विद्युत पुरवठा खंडित करून दोन जेसीबी आणि एक पोकलँडच्या सहाय्याने फहीमच्या घराचा अतिक्रमण असलेला भाग पालिकेने तोडला. या कारवाईवेळी पालिकेने आजूबाजूची घरेही काही काळासाठी रिकामी केली होती. फहीमव्यतिरिक्त नागपूर दंगलीतील आणखी दोन आरोपींच्या घरावर पालिकेने कारवाई केली. आरोपी युसूफ शेखच्या महाल भागातील जोहरीपूर येथील घरावर पालिकेने हातोडा चालवत पार्किंगमधील एका अनधिकृत खोलीसोबतच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचे बांधकाम तोडले. त्याच्या शिवाजी चौकातील एका दुकानावरही कारवाई केली. तर आरोपी शाहीन अमीनच्या दोन दुकानांना टाळे ठोकले.
22 मार्च रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे जाऊन दंगलीचा आढावा घेतला होता. त्यावेळी हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांना करावी लागेल. त्याची मालमत्ताही जप्त केली जाईल. जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे बुलडोझर चालवला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर लगेच काल नागपूर महापालिकेने फहीमच्या कुटुंबियांना नोटीस बजावून घर रिकामे करायला सांगितले होते.
बुलडोझर कारवाईला कोर्टाची स्थगिती
फहीम खानच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून आजच स्थगितीही देण्यात आली. पालिकेच्या कारवाईविरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कारवाई करताना महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा दावा या याचिकेतून केला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाने बुलडोझर वापरून सुरू असलेल्या पाडकामाला स्थगिती दिली असून 15 एप्रिलपर्यंत महापालिकेला आपली बाजू मांडण्याचे निर्देशही दिले आहेत.
