Yeh Jawaani Hai Deewani Rerelease: भारतीय चित्रपटसृष्टीत मागील काही महिन्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे महिला केंद्रित चित्रपटांची जास्तीत जास्त निर्मिती होत असताना, जुन्या चित्रपटांना पुन्हा नव्या पडद्यावर रिलीज करण्याचा ट्रेंड देखील वाढला आहे. यामुळे आधी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले चित्रपट देखील आता प्रचंड मोठी कमाई करत आहे.
याआधी तुंबाड, लैला मजनू, करण अर्जून, रॉकस्टार, कल हो ना हो सारखे अनेक चित्रपट (Hindi Movies) बॉक्स ऑफिसवर पुन्हा रिलीज झाले आहेत. या लिस्टमध्ये आता ‘ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) या चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना पुन्हा नवीन पडद्यावर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
‘ये जवानी है दिवानी’ पुन्हा मोठ्या पडद्यावर
रणबीर कपूर (Ranbir Kapoor), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट 46 पेक्षा अधिक शहरांमधील 140 थिएटर्समध्ये पुन्हा रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे.
चित्रपटांनी पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड काय आहे?
मागील वर्षभरात जुने चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड वाढला आहे. एकेकाळी बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयशी ठरलेले चित्रपट पाहण्यासाठी आता पुन्हा प्रेक्षक गर्दी करत आहे. एकीकडे नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठव फिरवत आहेत, पण जुन्या चित्रपटांना पसंती देत आहे. ‘ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई रिरिलीजचा ट्रेंड यशस्वी होत असल्याचेच उदाहरण आहे.