पुणे- राज्यात सध्या सर्वत्र थंडीचा जोर वाढला आहे. काही भागांतील तापमान तब्बल ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मात्र, आता पुणे वेधशाळेने राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या १९,२० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच २० डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.पुणे परिसरात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच १९, २० डिसेंबरला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
