या’ लोकप्रिय वेदनाशामक औषधावर बंदी घालण्याचा निर्णय, सरकारने नेमलेल्या समितीची शिफारस

Ban on Nimesulide: वेदनाशामक आणि तापावरील औषध म्हणून वापरण्यात येणाऱ्या Nimesulide (nimesulide) औषधाच्या गोळीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) समितीने या औषधाच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

निमेसुलाईड या औषधांचा प्रौढांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयने गेल्यावर्षी ही समिती नेमली होती. याबाबत ड्रग टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्ड (DTAB) आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने शिफारस केली होती. या औषधाचा रुग्णांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

रिपोर्टनुसार, समितीने या औषधाच्या वापर केल्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आता यावर आता पूर्णपणे बंदी घालावी अशी शिफारस केली आहे. तसेच, Nimesulide ऐवजी इतर सुरक्षित पर्याय देखील उपलब्ध आहेत. या पर्यायी औषधांच्या मदतीने अधिक सुरक्षितरित्या ताप व वेदनेवर उपचार करणे शक्य आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 150 पेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. ही औषधे शरीराला हानीकारक असल्याचे कारण देत सरकारकडून या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.