यंदा राज्यातील केशर आंबा महिनाभर आधीच बाजारात

नवी मुंबई- साधारणपणे
राज्यातील केशर आंबा हा एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला बाजारात दाखल होतो.मात्र,यंदा मार्चअखेरी पासूनच केशर बाजारात दिसू लागला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तर मोठ्या प्रमाणावर केशर आंबा बाजारात उपलब्ध असेल.

राज्यातील पुणे सांगोला, धाराशिव,मराठवाडा आणि खानदेश आदी भागातील केशर आंबा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. या केशरला १५० ते १७० रुपये किलो दर मिळत आहे.केशर मार्चच्या अखेरीस किरकोळ प्रमाणात बाजारात आला आहे. यंदा केशरला चार-पाच टप्प्यात मोहर आला आहे. एकाच झाडावर काढणीला आलेला,पिकलेला आंबा, कैरी स्वरुपातील आंबा, लिंबाच्या आकाराचा आंबा आणि नुकताच मोहरातून बाहेर येऊन लिंबोळीच्या आकाराचा आंबा दिसत आहे.पहिल्या टप्प्यातील मोहरापासून आलेल्या आंब्याची काढणी १५ मार्चपासून सुरू झाली आहे.यंदा मार्चच्या मध्यापासून जूनअखेरपर्यंत केशर आंबा बाजारात असेल,अशी माहिती महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोकण वगळता राज्यभरात केशर आंबा लागवडीखालील क्षेत्र सुमारे ५३,००० हेक्टरवर आहे.प्रत्यक्षात फळ देणारी झाडे फक्त पंधरा हजार हेक्टरवर आहेत. बाकी शेतकऱ्यांनी फक्त अनुदान मिळवण्यासाठी आंब्याची लागवड केली किंवा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे झाडे जळून गेली आहेत. यंदा सरासरी इतके उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top