पणजी – यंदाचा सनबर्न महोत्सव डिसेंबरच्या अखेरीस पेडण्यातील धारगळ येथे आयोजित केला जाणार आहे.मात्र त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.इतकेच नाही तर या ‘सनबर्न’ विरोधात गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
स्थानिक नागरिक भारत नारायण बागकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.हा महोत्सव धारगळमध्ये नकोच, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या कार्यक्रमामुळे ध्वनी तसेच लाईटचे प्रदूषण निर्माण होऊ शकते, गावात दारू आणि प्रतिबंधित पदार्थांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे महोत्सवाच्या नियोजित जागेपासून २०० मीटर अंतरावर हॉस्पिटल आहे. त्यामुळे त्याचा रूग्णांना त्रास होईल,अशी भीती त्यांनी याचिकेत व्यक्त केली आहे.
या याचिकेत राज्य सरकार,
पर्यटन संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी,राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ,गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण ,बार्देश – पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी,पेडणे पोलीस निरीक्षक,मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळचे प्राधिकरण तसेच जलस्रोत खाते,धारगळ पंचायत सरपंच व सचिव,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,केंद्र सरकार तसेच सनबर्न फेस्टीव्हलचे आयोजन करत असलेली मे. स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.