म्हापसा – गोव्यातील म्हापसा पालिकेला न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणास्तव आसगाव पठारावर कचरा टाकण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे. दस्ताऐवजांची यादीचा रेकॉर्ड न ठेवल्यामुळे ४० वर्षांपूर्वी कोमुनिदादकडून सामंजस्यपणाने मिळवलेली ही जागा म्हापसा पालिकेला सोडावी लागली आहे.
म्हापसा पालिकेने १९८५ मध्ये आसगाव कोमुनिदादला विश्वासात घेत पठारावरील सुमारे ३० हजार चौ.मी.जागा कचरा टाकण्यासाठी मिळवली होती.गणेशपुरी जवळील आसगाव पठारावरील जागा कचरा टाकण्यास योग्य असल्यामुळे तिथे पालिकेने कचरा टाकण्यास सुरुवात केली.त्यावेळी या जागेत चिरेखाणींचे खंदक होते. कचऱ्याने हे खंदक बुजवण्यात आले. त्यावेळी पालिकेकडून सांडपाणीवाहणारे टँकर देखील याठिकाणी रिकामी केले जात होते.
२०१२ मध्ये उच्च न्यायालयाने प्रदूषणाच्या मुद्यावरून आसगाव पठारावर कचरा टाकण्यास मनाई केली.त्यामुळे पालिकेने कुचेली येथे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला.या प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे आसगाव पठारावरच पालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी दोन मोठ्या शेड बांधल्या.विनापरवानगी हे बांधकाम केल्यामुळे आसगाव पंचायतीने पालिकेच्या या दोन्ही लोखंडी शेडना अतिक्रमण हटाव नोटीस जारी केली.हा खटला सध्या पंचायत संचालनालयात सुरू आहे.आता तर न्यायालयाचा अवमान केल्यामुळे पालिकेला आसगाव पठारावर कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली असून या जागेच्या फाटकाला टाळे ठोकले आहे.