बँकॉक- म्यानमार आणि थायलंड हे देश आज रिश्तर स्केलवर ७.७ इतकी तीव्रता असलेल्या महाभयंकर भूकंपाने हादरले. या शक्तिशाली भूकंपामुळे दोन्ही देशांत मोठा विध्वंस झाला असून हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. अनेक इमारती कोसळल्या असून त्यांच्या ढिगार्याखाली मोठ्या प्रमाणावर लोक अडकले आहेत. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. दोन्ही देशांनी आणीबाणी जाहीर केली असून युद्धपातळीवर मदतकार्य चालू आहे. या भूकंपात मोठी वित्त आणि प्राणहानी झाल्याचा अंदाज आहे.
आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ७.७ रिश्तर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का बसला. १० मिनिटांनी भूकंपाचा ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला. युएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू सागाईंग शहराच्या वायव्येस १६ किमीअंतरावर जमिनीत १० किमी खोलीवर होता. सकाळी पहिला भूकंपाचा धक्का जाणवल्यावर म्यानमारमध्ये लोक रस्त्यावर धावले. अनेकांनी मोकळ्या मैदानात आश्रय घेतला. घर, कार्यालयातील वस्तू हलत, हिंदकळत होत्या. इमारतींचे बांधकामही कोसळत होते. खिडक्यांच्या काचा फुटत होत्या. अनेक घरे पूर्णपणे भुईसपाट झाली. काही इमारतींना मोठे तडे गेले. अनेक मंदिरे जमीनदोस्त झाली. तर एका मशिदीत रमाजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारच्या नमाज पठणासाठी मुस्लिमांनी गर्दी केली होती. ही मशीद कोसळल्याने हे सगळे लोक ढिगार्याखाली गाडले गेले. भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले राजवाड्याचा काही भाग कोसळला. म्यानमारची राजधानी नायपिदावमधील अनेक मंदिरे आणि घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यांनाही भेगा पडल्या. मंडाले शहरातील इरावती नदीवरील प्रसिद्ध अवा पूल कोसळला. मंडाले विमानतळावरही भूकंपामुळे गोंधळाची परिस्थिती उद्भवली. प्रवाशांनी रन-वेवर धाव घेतली. बराच वेळ ते रन-वेवर थांबून होते. विमानतळावरील कर्मचारी त्यांनी धीर देत होते. भूकंपानंतर म्यानमार सरकारने लगेच आपत्कालीन बैठक घेत आणीबाणी जाहीर केली. लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले.
भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ९०० किमी अंतरावर असलेल्या बँकॉकमध्येही मोठा उत्पात घडवला. बँकॉकमधील अनेक बहुमजली इमारतींच्या छतावरील स्विमिंग पूलमधील पाणी हिंदकळून धबधब्यासारखे खाली पडले. भूकंपाच्या वेळी इमारतीमध्येही कंपने जाणवत असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी बाहेर पळ काढला. बँकॉकमधील एक ३० मजली निर्माणाधीन इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे केसळली. या इमारतीखाली ८०हून अधिक लोक अडकले होते. ही इमारत पडतानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो थरकाप उडवणारा होता. संध्याकाळी अंधार पडू लागल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. भूकंपानंतर वीजपुरवठाही बंद करण्यात आला. भूकंपामुळे मेट्रो स्थानकावर उभी असलेली एक मेट्रो ट्रेन गदागदा हलत होती. त्यानंतर मेट्रो वाहतूक थांबवण्यात आली. बँकॉकच्या शेअर बाजारातील व्यवहार थांबवण्यात आले. विमानतळ आणि बोगदेही बंद करण्यात आले आहेत. भूकंपानंतर अनेक भागांतील वीजपुरवठा खंडीत झाला. मदतकार्यात अमेरिकन उपग्रह मदत करत होते. परंतु ते सूर्यप्रकाशातच काम करू शकतात.
बँकॉकमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या मानवी तनेजा ही भारतीय महिला म्हणाली, भूकंपाचा थक्का पहिल्यांदा जाणवला, तेव्हा मी हॉटेलच्या रूमध्ये होते. मला सुरुवातीला वाटले की, मी उन्हातून फिरून आल्यामुळे मला चक्कर येत असल्याने सगळे हलत आहे. पण हॉटेलच्या भींतीना तडे जात असल्याचे पाहून हा भूकंप असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना हॉटेल व्यपस्थापनाने खाली जायला सांगितले. आम्ही लिफ्टचा वापर न करता जिन्याने खाली उतरलो, तेव्हा रस्त्यावर लोक सर्वत्र धावताना दिसत होते. धावताना एक दुसर्यावर पडत होते.सगळीकडे भीतीचे वातावरण होते. भूकंपानंतर सगळी दुकाने, मॉल, मार्केट बंद झाले होते. त्यामुळे कुठे काहीच विकत मिळत नव्हते. वीज, इंटरनेटही बंद होते. स्थानिक लोकांनी आम्हाला प्यायला पाणी दिले. अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प सुरू करण्यात आले होते. तिथे जखमींवर प्रथमोपचार दिले जात होते. सगळीकडे अनागोंदीचे वातावरण होते.
चीनमधील युनान प्रांतातही अनेक ठिकाणी भूकंपामुळे मोठ्या इमारतींना तडे गेले.काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अग्निशमन आणि बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. लष्कराच्या पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात नद्यांच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे पूरस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासन सज्ज होते. चीनमधील भूकंपविषयक संस्थांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
म्यानमार, थायलंड, चीनसह भारत आणि बांगलादेशमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मेघालयातील पूर्व गारो हिल्समध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. म्यानमारला लागून ३९० किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या मणिपूरमध्येही सौम्य धक्के जाणवले. परंतु कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तर बांगलादेशमधील ढाका, चितगाव या शहरा्सह अनेक भागांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
सागाईंग फॉल्ट हा जगातील सर्वात भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. याआधीही येथे अनेक शक्तिशाली भूकंप झाले आहेत. म्यानमारच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंप २३ मे १९१२ रोजी झाला होता. त्याची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. त्यावेळीही बरेच नुकसान आणि जीवितहानी झाली होती.