मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या १० ते १५ एप्रिलपर्यंत कधीही केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होणार आहे.
सध्या या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अंतिम काम सुरू असून पुढील आठवड्यात सीएमआरएस म्हणजे कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी इन्स्पेक्शन होणार आहे. हे निरीक्षण यशस्वी झाल्यानंतर नेमके उद्घाटन कधी होणार याची तारीख जाहीर केली जाईल. मेट्रो लाईन -३ या दुसऱ्या टप्प्यांत बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रो धावणार आहे. बीकेसीसह या मार्गावर एकूण सहा स्थानके असतील.यामध्ये धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश राहणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
