शिलाँग – मेघालयच्या वेस्ट गारो हिल्स आणि साऊथ गारो हिल्स या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागांत भूस्खलन आणि पुरामध्ये सुमारे दहा जणांचा बळी गेला. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.
साऊथ गारो हिल्स जिल्ह्यातील गासुआपारा परिसरात शनिवारी भूस्खलनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. तर त्याआधी शुक्रवारी वेस्ट गारो हिल्स जिल्हयात पुराच्या लोंढयात वाहून गेल्याने तीन जणांचा बळी गेला. या परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार पाऊस झाला. या पावसाने गासुआपाराबरोबरच दालू परिसरातही परिस्थिती बिकट बनली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा या राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.