मुस्लिमांनी विरोध केला! पोलिसांनी परवानगी नाकारली! वडाळ्यात रामनवमी शोभायात्रा काढण्यावरून राडा


मुंबई- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला वडाळ्यात रामनवमी शोभायात्रा काढण्यास मुस्लीम समाजाने निवेदन देऊन विरोध केला. यामुळे पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली नाही. तरीही या यात्रेसाठी हजारो कार्यकर्ते आज जमताच पोलिसांनी लाठीमार केला. यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी वडाळा पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्यानंतर भाजपा नेते पोलीस स्टेशनला आले आणि अखेर पोलिसांनी शोभायात्रा काढण्यास परवानगी दिली.
रामनवमीच्या दिवशी दरवर्षी वडाळ्यात शोभायात्रा निघते. मात्र यंदा पोलिसांनी या यात्रेला परवानगी नाकारली. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असूनही विश्व हिंदू परिषदेने यात्रेचे आयोजन केले. ही यात्रा सुरु होण्याआधीच पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांना लाठीमार सुरु केला. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वडाळा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जय श्रीराम, जय हनुमानचा घोष केला. या सर्व पार्श्वभूमीवर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले, पण तणाव कमी झाला नाही. अखेर भाजपा मंत्री लोढा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले आणि यात्रेलाही परवानगी मिळाली.
आंदोलकांनी सांगितले की, डीसीपी आणि एसीपी यांनी आम्हाला लाथा मारल्या आणि बांबूने मारहाण केली, शिवीगाळही केली. हे असेच सुरू राहिले तर सर्व संपून जाईल. आम्ही यात्रेची तयारी करत होतो. पण पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली. तिथे जेवढे कार्यकर्ते उपस्थित होते त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेराव घातला. आम्ही सर्वजण शांत होतो, आम्ही फक्त घोषणा देत होतो. पोलिसांनी सांगितले, आत चला. आम्ही आतदेखील निघालो होते, मग त्यांनी लाठीमार का केला? पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांचे बॅनर फाडले. ज्यांनी आम्हाला शिवीगाळ केली ते पोलीस आता पोलीस ठाण्यातून नंतर पळून गेले आहेत. आम्ही गेली 10 ते 15 वर्षे ही शोभायात्रा काढत आहोत, पण कधीच असा प्रकार घडला नव्हता. मग यावेळीच असे का झाले? आम्ही शांततेत रॅलीची तयारी करत होतो. तेवढ्यात तिथे पोलीस आले आणि आम्हाला शोभायात्रा काढण्यास मनाई केली. ते म्हणाले की इथे 65 टक्के मुस्लीम भाग आहे, त्यामुळे तुम्ही कार्यक्रम रद्द करा. इथल्या 200 मुस्लीम नागरिकांनी एक पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, ही शोभायात्रा काढल्यास दंगा होईल. त्यामुळे यात्रेला परवानगी नाकारली. आजवर कधी दंगा झाला नव्हता, तरीही त्यांच्या भीतीने आमच्या शोभायात्रेला मनाई केली.
ही यात्रा काढण्यावरून तणाव निर्माण झाला आहे हे वृत्त पसरताच नवी मुंबई येथून बजरंग दलाचे कार्यकर्ते वाहने घेऊन वडाळ्याकडे जाण्यास निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना टोलनाक्यावरच अडवून पोलीस ठाण्यात नेले.