मुख्यमंत्री शिंदे वारेमाप घोषणा करतात! अजित पवार मंत्रिमंडळ बैठक सोडून गेले

मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून महायुतीमधून अजित पवार गटाला बाहेर काढण्याचे पध्दतशीर प्रयत्न केले जात आहेत. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीतही मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी देण्यावरून खटके उडाले. अजित पवार यांनी या प्रकल्पाला मंजुरी देण्यास नकार दिल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे भडकले. तुम्ही सही करणार नसाल तर मुख्यमंत्री या नात्याने मी या प्रकल्पाला मंजुरी देईन, अशा शब्दात शिंदे यांनी अजित पवार यांना सुनावले. त्यानंतर अजित पवार बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले. मात्र, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे एकनाथ शिंदे वारेमाप घोषणा करतात. परंतु त्यांना निधी द्यायला अजित पवारांचा विरोध असतो, हे खरे यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत असे काही घडल्याचा इन्कार केला असला तरी यावरून होणारी चर्चा थांबलेली नाही.
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार केवळ दहा मिनिटेच हजर होते. ते निघून गेल्यानंतरही बैठक दोन-अडीच तास सुरू होती. यादरम्यान 38 निर्णय घेण्यात आले. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी निधी अर्थ विभागाकडून येणार आहे. मात्र अर्थमंत्रिपदी असलेल्या अजित पवार यांच्या गैरहजेरीतच हे निर्णय रेटून नेण्यात आले. मागील काही आठवड्यात अनेकदा दिसून आले आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगाऊ सूचना न देता शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव मांडले जातात. या प्रस्तावांसाठी निधी देण्याची आवश्यकता असते. अर्थमंत्री अजित पवार यांचा अशा आयत्या वेळी आणलेल्या प्रस्तावांना विरोध असतो. ते राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, पण शिंदेंच्या आग्रहामुळे त्यांना माघार घ्यावी लागते.
2024-25 या आर्थिक वर्षांत राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर जाण्याची भीती अर्थ विभागाने आधीच व्यक्त केली आहे. हे प्रमाण राज्याच्या सकल उत्पादनाच्या तुलनेत कमाल 3 टक्के असावे, अशी मर्यादा कायद्याने निश्चित केले आहे. मात्र आर्थिक बेशिस्तीमुळे ही कमाल मर्यादा ओलांडली जाईल, असा इशारा अर्थ विभागाने दिला आहे. या आर्थिक बेशिस्तीचे खापर अर्थ मंत्री या नात्याने अजित पवार यांच्या माथ्यावर फुटणार. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे एकनाथ शिंदे वारेमाप घोषणा करीत आहेत.अर्थ विभागाने दिलेल्या गंभीर इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करीत मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा या दोन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अजित पवार यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की, मला काही कामानिमित्त लातूरला जायचे होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगूनच बैठकीतून बाहेर पडलो.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही म्हणाले की, मी त्यावेळी रायगडमध्ये होतो. त्यामुळे बैठकीत नेमके काय झाले हे मला माहीत नाही. पण अजित पवार जरी बैठक सोडून गेले असले तरी त्याचा अर्थ महायुतीत वाद आहे असा होत नाही. अन्य काही कारणे असू शकतील. तर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीदेखील असे सांगितले की, जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी कोणतरी केलेला हा खोडसाळपणा आहे. महायुतीत फूट पाडण्याचा विरोधकांचा हा कुटील डाव आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कसलाही वाद नाही.
यावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीका केली. ते म्हणाले की, अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचा हा डाव असावा. महायुतीच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेहमीच वाद होत असल्याचे समोर येत आहे. हे वाद राज्याच्या हितासाठी नसून हे स्वतःच्या हितासाठी, स्वार्थासाठी सुरू आहेत. तिजोरीत पैसे नसतानाही एका एका दिवसात 80-80 निर्णय घेतले जात आहेत. अर्थविभागाला शिस्त लावण्याचे काम अजित पवारांनी अनेकदा केले आहे. मात्र आता अजित पवारांना बाजूला सारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अलीकडे अर्थखात्याची शिस्त बिघडवली जात आहे. महायुती सरकार राज्याला कंगाल करून सोडेल. त्यामुळेच अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून काढता पाय घेतला असावा.
मागील काही आठवड्यांत शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात अनेकदा खटके उडाले आहेत. बारामतीमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरील अजित पवार यांचा फोटो कपड्याने झाकला होता. त्यावरून शिंदे आणि अजित पवार समर्थकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाईल असे दिसू लागल्याने पोलिसांनी दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.गणेशोत्सवानिमित्त शिंदे समर्थकांनी बारामतीमध्ये एका कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाकडे अजित पवार यांनी पाठ फिरवली होती.
मंत्रिमंडळात काल झालेल्या नाराजी नाट्यानंतर अजित पवार गटाने आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद राष्ट्रवादीत होणाऱ्या प्रवेशासंदर्भात होती. या पत्रकार परिषदेत कोणी मोठा सेलिब्रिटी नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रवेशासंबंधी उत्सुकता होती. दिवसभराच्या बातम्यांमुळे ती आणखी ताणली गेली. पत्रकार परिषदेला तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अनंत परांजपे, सरोज अहिरे, विक्रम काळे, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पहिली फळीच उपस्थित होती. मात्र अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *