कोलकाता- कोलकातामधील आर जी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्काराच्या घटनेनंतर ३३ दिवसांपासून आंदोलन करणार्या डॉक्टरांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. मात्र, आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी, जोपर्यंत चर्चा होत नाही. आमच्या सर्व मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, तोपर्यंत कोणतीही तडजोड करण्यास आम्ही तयार नाही, असे सुनावत आंदोलन थांबवण्यास ठाम नकार दिला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलीस महासंचालक राजीव कुमार जेव्हा आंदोलनकर्त्या डॉक्टरांना भेटायला आल्या, तेव्हा त्यांनी आंदोलनस्थळी घोषणाबाजी सुरू केली. ते वुई वाँट जस्टीसच्या घोषणा देत होते. मुख्यमंत्री कित्येक मिनिटे माईक घेऊन उभ्या राहिल्या. मात्र, त्यांना भाषण सुरू करता येत नव्हते. ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना म्हणाल्या की, तुमच्या आंदोलनाला मी सलाम करते. मी तुमच्या आंदोलनाचे समर्थन करते. मीदेखील एक विद्यार्थी नेता होते. ३ माझे पद मोठे नाही, तुमचे पद मोठे आहे. मला शुक्रवारी रात्रभर झोप लागली नाही, कारण तुम्ही सगळे इतक्या मुसळधार पावसात आंदोलन करत होतात. तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. आंदोलन संपवण्याची तुमची इच्छा असेल, तर मी माझ्या अधिकाऱ्यांशी बोलते आणि तुमच्या मागण्यांचा अभ्यास करते. मी तुमच्या सगळ्या मागण्यांचा विचार करेन. मी सीबीआयला सांगेन की, आरोपीला फाशी द्या. तुम्ही कामावर परत येत असाल, तर मी वचन देते की, तुमच्या मागण्यांवर विचार करेन. मी तुम्हाला विनंती करते की, मला थोडा वेळ द्या.
राज्य सरकार तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. रुग्णालयाचा विकास, पायाभूत सुविधा, सुरक्षेशी संबंधित सर्व कामे सुरू झाली आहेत आणि पुढेही केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. परंतु आंदोलक डॉक्टरांनी आंदोलन थांबवण्यास स्पष्ट नकार दिला.