मुख्यमंत्री दुर्गा …..

मुख्यमंत्री दुर्गा ….. अन्वरा तैमूर (आसाम)
आपल्या जीवनाचा प्रवास कोठून कुठे होईल ते सांगता येत नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट होऊन आसामच्या जोरहाट येथील मुलींच्या कॉलेजात अर्थशास्त्राच्या प्रोफेसर असलेल्या अन्वरा तैमूर अचानक राजकारणात आल्या. 1978 साली आसामच्या शिक्षण मंत्री झाल्या. त्यानंतर दोनच वर्षात 1980 साली त्या आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या मुस्लीम मुख्यमंत्री बनल्या. पण सहाच महिन्यांत आसाम राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. 2011 पर्यंत त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियात आपल्या पुत्राकडे राहायला गेल्या आणि 2020 साली तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

मेहबूबा मुफ्ती (जम्मू-काश्मीर)
जम्मू – काश्मीरच्या विधानसभेसाठी नुकतीच निवडणूक झाली. नॅशनल कॉन्फरन्स आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी हे राज्यातील दोन आघाडीचे पक्ष आहेत. यातील पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यंदा निवडणूक लढल्या नाहीत. त्यांची कन्या इल्तेजा यावेळी मैदानात उतरली आहे. जम्मू – काश्मीरचे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद आणि गुलशन आरा यांची ही कन्या वकील झाली. दिल्लीत बँकेत कामाला लागली, मग विमान कंपनीत नोकरी केली आणि शेवटी काश्मीरला परतली. काश्मीरच्या वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदारकी, खासदारकीची निवडणूक लढत ती पक्षाची अध्यक्ष झाली आणि 2016 साली भाजपाशी युती करून मुख्यमंत्री झाली. जम्मू-काश्मीरची ती पहिली महिला मुख्यमंत्री बनली. 2019 पर्यंत भाजपाशी न पटल्याने तिने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून बहुतेक काळ ती घरात कैदेत असते.

आतिशी मार्लेना (दिल्ली)
मद्य घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर ते या खुर्चीवर आपल्या पत्नी सुनिता यांना बसवतील, अशी अटकळ होती. ती खोटी ठरवत त्यांनी आतिशी मार्लेना यांचे नाव सुचवले. गोपाल राय आणि कैलाश गेहलोत यासारखे
वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतानाही आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि आतिशी दिल्लीच्या तिसर्‍या महिला मुख्यमंत्री ठरल्या. पंजाबी राजपूत कुटुंबातून आलेल्या आणि ऑक्सफर्ड विद्यापिठात शिकलेल्या आतिशी यांनी केजरीवाल, सत्येंद्र जैन असे आपचे महत्त्वाचे नेते तुरुंगात असताना पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्याची बक्षिसी मुख्यमंत्रिपद मिळण्याआधी शिक्षण मंत्रिपदाच्या रूपाने मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या पूर्व दिल्ली मतदारसंघात गौतम गंभीरकडून 4 लाख 77 हजार मतांनी दणदणीत पराभूत झाल्या होत्या. मात्र, 2020 च्या विधानसभा मतदारसंघातून विजयी होत पहिल्यांदाच आमदार झाल्या. त्यानंतर चार वर्षांत त्यांनी मोठी झेप घेतली. मात्र, पदभार स्वीकारताना त्यांनी केजरीवाल यांच्या खुर्चीवर न बसता त्यांनी आपल्या निष्ठेचे प्रदर्शन घडवले. मुख्यमंत्रिपदी येताच दिल्लीच्या रस्त्यावरील खड्ड्याच्या प्रश्नावरून त्या रस्त्यावर उतरल्या. फायर ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या आतिशी राजकारणात दीर्घ इनिंग्ज खेळतील, असे दिसते आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top