ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यात जन्म, कोडाई कॅनल, मुंबईत उच्च शिक्षण आणि राजकीय कर्मभूमी राजस्थान असे वसुंधराराजे शिंदेंबाबत घडले. राजकारणाचे बाळकडू तर त्यांना घरातूनच मिळाले. आई राजमाता शिंदे यांना भाजपात आणि भाऊ माधवराव शिंदे काँग्रेसकडून राजकारणात होते.
वसुंधराराजे यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकत भाजपामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. त्यांच्या-कडील नेतृत्वगुण, विनम्र स्वभाव आणि पक्षावर असलेली निष्ठा पाहून त्यांना 1998 मध्ये वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्रिपद देण्यात आले. 1999 साली पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्याकडे अणूऊर्जा विभाग आणि अवकाश तंत्रज्ञान विभागाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला. वसुंधरा राजेंना योग्य वेळी योग्य संधी मिळत गेल्या आणि या संधीचा फायदा घेऊन वसुंधराराजे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
वसुंधराराजे मंत्री असतानाच राजस्थानचे भैरोसिंह शेखावत हे उपराष्ट्रपती झाले. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजपात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यावेळी समर्थपणे राजस्थानचे राजकारण सांभाळू शकेल, असा नेता भाजपाला हवा होता. ती पात्रता वसुंधराराजे यांच्याकडे असल्याने त्यांना राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. 2003 च्या विधानसभा निवडणुकीत त्या झालरापाटन मतदारसंघातून विजयी झाल्या. वसुंधराराजे प्रदेशाध्यक्ष असताना राजस्थानमध्ये भाजपाला विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळून राज्यात भाजपाची सत्ता आली. याचे बक्षीस म्हणून त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. 1 डिसेंबर 2003 ते 10 डिसेंबर 2008 या काळात त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या.
2008च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले. भाजपाचा दारुण पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेवर आली. पुढील पाच वर्षे वसुंधराराजे विरोधी पक्षनेत्या होत्या. 2013 मध्ये पुन्हा एकदा राजस्थानात कमळ फुलले.
वसुंधराराजेंना दुसर्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. यावेळीही त्यांनी 12 डिसेंबर 2013 ते 17 डिसेंबर 2018 असा पाच वर्षांचा कार्यकाळ पुन्हा एकदा पूर्ण केला. परंतु 2018 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून वसुंधराराजेंची उतरती कळा सुरू झाली. 2023 मध्ये काँग्रेसला हरवून राजस्थानात पुन्हा भाजपाची सत्ता आली. परंतु यावेळी वसुंधराराजेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली नाही. भाजपाच्याअंतर्गत राजकारणाचा फटका त्यांना बसला. वसुंधराराजेंची कारकीर्द अजून संपलेली नसली तरी भवितव्य अंधारात आहे.