मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव द्या

मुंबई – मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र सुवर्णकार सेनेकडून करण्यात आली.

नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे यासाठी गेले ६ ते ७ वर्षापासून मागणी केली जात आहे. या मागणीसाठी राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा केला. राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. मात्र पाठपुरावा न केल्याने तो प्रस्ताव रखडला. नाना शंकरशेट यांचे मुंबईसाठी असलेले भरीव काम लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे. ओल्ड कस्टम हाऊस येथे असलेल्या एशियाटिक लायब्ररीमध्ये त्यांचा २५ फुटांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष प्रविण जुवाटकर यांनी दिली.