मुंबई- मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार पडलेल्या ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी करत ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळविला आहे.
२१ सप्टेंबर रोजी इटलीतील सेर्व्हिया या निसर्गरम्य परिसरात ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जगभरातील विविध देशांतील २४३९ स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील २८ स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता.त्यामध्ये पालिका उपायुक्त विश्वास मोटे हेसुद्धा एक स्पर्धक होते. त्यांनी स्पर्धेतील एड्रियाटिक समुद्रात पोहणे, दुचाकी चालवणे आणि धावणे हे तीनही प्रकार १५ तास २५ मिनिटे आणि ४ सेकंदात पूर्ण करुन ‘आयर्न मॅन’ किताब मिळवला.नोव्हेंबर २०२२ मध्ये गोव्यात पार पडलेल्या ‘आयर्नमॅन ७०.३०’ या स्पर्धेच्या माध्यमातून मोटे यांनी आपल्या या प्रवासाला सुरुवात केली होती. गोव्यातील स्पर्धेत त्यांनी १.१ किलोमीटर अंतर ५० मिनिटे २७ सेकंदात पोहून पूर्ण केले होते.तसेच ९० किलोमीटर अंतर ३ तास ४९ मिनिटे आणि ३६ सेकंदांच्या कालावधीत दुचाकी चालवून तर २१.९ किलोमीटर अंतर २ तास २१ मिनिटे आणि ५१ सेकंद अवधीमध्ये धावून पूर्ण केले होते.