- पाच जण जखमी
मुंबई- मुंबई- पुण्यात आज पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटना घडल्या. त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु या घटनांत पाच जण जखमी झाले.
पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी गावातील नानेकर चाळीजवळ काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या एक वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने तिथून पळ काढला. उपस्थित नागरिकांनी कारचालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. याबाबत पिंपरी पोलिसांना कळवल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याची देखील तपासणी केली जात आहे. ही हिट अँड रनची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पुण्याव्यतिरिक्त मुंबईतही आज सकाळी अशीच घटना घडली. मुलुंडमध्ये भरधाव ऑडी कारने दोन रिक्षाचालकांना धडक दिली. या अपघातानंतर ऑडीचालक त्याची गाडी घटनास्थळीच सोडून फरार झाला. या अपघातामध्ये दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दोन प्रवासी आणि दोन्ही रिक्षांचे चालक जखमी झाले. जखमी प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. यामधील एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर आहे. मुलुंड पोलिसांनी ऑडी कार ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.