मुंबई- 26/11/2008 या दिवशी मुंबईवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 116 जणांचे प्राण गेले. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला 27 वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. उद्या पहाटेपर्यंत त्याला घेऊन येणारे विमान दिल्लीला पोहोचेल. भारतासाठी हे मोठे यश आहे. आजपर्यंत अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहीम आणि फरार उद्योजक विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना भारतात खेचून आणण्याच्या घोषणा अनेकदा झाल्या आणि अनेकदा आकाशात विरल्या. मात्र तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्याची मोठी कामगिरी पार पडली आहे.
तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी नागरिक होता. तो पाकिस्तानात ड्रायव्हरचे काम करायचा. त्यानंतर 2001 साली तो कॅनडाला स्थलांतरित झाला आणि कॅनडाचा नागरिक बनला. तेथे तो इमीग्रेशनचे काम केल्याचे दाखवायचा. मात्र प्रत्यक्षात त्याचा पाकिस्तानी गुप्तहेर आयएसआय खात्याशी संबंध होता. नंतर त्याचा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंध आला. तहव्वूर राणा आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हीड हेडले हे एकत्र काम करू लागले. भारतात दहशतवादी हल्ला करण्याची योजना आकार घेत असताना तहव्वूर राणाने डेव्हिड हेडलेला मदत करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याचा हेडले हा मास्टर माईंड होता. राणाने त्याला मदत करताना भारतात येऊन हल्ल्यांच्या ठिकाणांची रेकी केली होती. 11 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात तो मुंबईत होता. मुंबईवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची त्याला पूर्ण कल्पना होती. हा हल्ला झाल्यानंतर तो अमेरिकेला पळून गेला. त्याला भारतात परत आणण्यासाठी 2010 पासून सतत प्रयत्न सुरू होते.
कोपनहेगन शहरातील जाईलॅण्डस् पोस्टेन या वर्तमानपत्रावर हल्ला घडविल्याच्या गुन्ह्याखाली त्याला अमेरिकेत अटक होऊन 14 वर्षांची शिक्षा झाली. यानंतर तो अमेरिकेच्या तुरुंगात होता. मात्र मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात तो दोषी आहे याचे पुरावे भारताने सातत्याने अमेरिकेला सादर केले आणि त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. 2023 साली अमेरिकेच्या कोर्टाने राणाला भारताकडे सोपविण्यास मंजुरी दिली. त्यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात आणि दिल्लीच्या तिहार कारागृहात त्याच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्याचे प्रत्यार्पण होणार होते. मात्र त्याने वरिष्ठ न्यायालयात अपिल केली. या खटल्याची सुनावणी दोन वर्षे चालली आणि या वर्षी न्यायालयाने त्याचे अपिल फेटाळून लावले. यामुळे राणाला भारतात आणण्याचा मार्ग खुला झाला. आज राणाला विमानात बसविण्यात आले असून मध्यरात्रीनंतर वा उद्या सकाळी तो भारतात पोहोचेल. भारतात दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्याचा ताबा घेईल. 26/11 च्या हल्ल्यात पकडला गेलेला अजमल कसाब याला याआधी फाशी देण्यात आलेली आहे. आता राणा भारतात आल्यानंतर त्याची चौकशी करून त्याबाबतच्या खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होईल.
सदानंद दातेंचा योगायोग
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा सीएसएमटी स्टेशनवरून दहशतवादी जवळच्या कामा रुग्णालयात गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांना मिळाली. यावेळी पोलीस प्रमुख सदानंद दाते हे कामा रुग्णालयात गेले. त्यांच्या येण्यामुळे दहशतवादी कामा रुग्णालयातून पसार झाले. मात्र त्यावेळी सदानंद दाते जखमी झाले होते. त्यांच्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. हे सदानंद दाते आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)चे प्रमुख आहेत. तेच आता तहव्वूर राणा याची चौकशी करणार आहेत. त्यांनी हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांना या हल्ल्याची पूर्ण माहिती असून, राणाची चौकशी करण्यात याचा निश्चित उपयोग होईल. राणाचे प्रत्यार्पण आणि त्याचवेळी सदानंद दाते एनआयएचे प्रमुख असणे हा योगायोग जुळून आला आहे.
