मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा

मुंबई – केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. उद्योग धंद्यांसह वीज, पाणी, परिवहन यासारखे सार्वजनिक उपक्रमही अदानीला दिले जात आहे. पण मी मात्र मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही. आमचे सरकार आल्यावर भाजपाने अदानीला दिलेले सर्व प्रकल्प रद्द करीन, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला. आज बीकेसीतील मविआच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदी, अमित शहा, शिंदे, फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला केला.
आज बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानीवर पुन्हा हल्ला केला. आमचे सरकार आल्यास धारावीकरांना त्यांच्या राहत्या जागेतच घरे आणि उद्योगधंदे देऊ. धारावी आणि आसपासचा संपूर्ण परिसर अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे धारावीतील माणूस तिथून बाहेर फेकला जावा आणि त्या परिसरात मोठमोठ्या लोकांना उद्योगधंदे आणि आलिशान घरे बांधता येतील, पण शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. ज्या दिवशी सरकार येईल त्यावेळी पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानीला दिलेले प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेऊ. नीती आयोगाने म्हणे मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवली आहे. माझे त्यांना सांगणे आहे, मुंबई ही स्वायत्त आहे. तिच्या अधिकारावर गदा आणू नका. एमएमआरडीएला म्हणावे तुमचे जे काय असेल ते मुंबईच्या बाहेर करा. मुंबईचे अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न कराल तर एमएमआरडीए रद्द करून टाकीन, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र सरकारने माझ्या वडिलांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले यामागे त्यांना बाळासाहेबांबद्दल आदर वगैरे होता असे काही नाही तर महापुरुषांच्या यादीत त्यांचे नाव टाकल्यावर त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार कोणालाही मिळतो. त्यामुळेच आज मिंधे माझ्या वडिलांचा फोटो वापरत आहेत हे एक मोठे षड्यंत्र होते, असा आरोपही त्यांनी केला. ‘बटेंगे तो कटेंगे’बद्दल बोलताना मुंबईवर घाला घातला तर काटेंगे असाही दम दिला. यंदाच्या निवडणुकीसाठी 90 हजार बुथवर भाजपा दक्षता पथके ठेवणार आहेत. प्रत्येक बुथवर 1 माणूस ठेवला तर 90 हजार आणि 2 ठेवले तर 1 लाख 80 हजार माणसे गुजरातवरून आणली जाणार आहेत. पहिल्यांदाच महाराष्ट्रातील निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुजरातमधून माणसे आणून नंतर त्यांना इथेच स्थायिक केले जाणार आहे. हा अंधार संपवायचा असेल तर मशाल धगधगती ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र मोदी-शहांचा होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी
व्यक्त केला.
दरम्यान, फलटणच्या सभेतही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेवर कडाडून हल्ला केला. ते म्हणाले की, ही महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही अशी ही निवडणूक आहे. आम्ही उघड उघड लढतो आहोत. तुम्ही जर त्यांना चोरून पाठिंबा देणार असाल, तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्रद्रोही आहात. शिवसेनेने हे चाळे कधी केले नाहीत. राजकीय वैमनस्य असेल तर उघडपणे करायचे. आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आहे. काही जाहिराती या गद्दारांनी दिल्या आहेत. गद्दारा, पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड. नामर्दाची औलाद, तुझ्यात हिंमत असेल तर स्वत:च्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागायला ये. मग कसे जोडे खातो ते बघ. जाहिरातीत बाळासाहेबांचे वाक्य टाकले आहे की, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बरोबर आहे, मग बाळासाहेब असे म्हणाले होते का की भाजपाची कमळाबाई होऊ देईन?
ते पुढे म्हणाले की, कालपरवा पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. त्यांनी मला आव्हान दिले की, मी राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेबांबाबत दोन शब्द चांगले बोलून दाखवावे. काल प्रियांका गांधी शिर्डीत आल्या होत्या, तेव्हा त्या बाळासाहेबांबाबत भरभरून बोलल्या. त्यांनी भाजपाचे दात घशात घातले. खरे तर ‘तोडा फोडा आणि राज्य करा’ हीच भाजपाची निती आहे. त्यांनी आपले सरकार गद्दारी करून पाडले. कारण त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि मी तो लुटू देत नव्हतो. म्हणून त्यांनी पहिला घाव शिवसेनेवर घातला. मिंधेंना कळत नाही. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची निती आहे. निवडणुकीच्या प्रचारात अमित शहा बोलले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. याचा अर्थ मिंधे गटाचा उपयोग संपला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top