मुंबई- पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच ‘वेव्हज’ केंद्र सरकारच्यावतीने १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे पार पडणार आहे. या उपक्रमासाठीच्या नोंदणीने ८५ हजारपेक्षा जास्त नोंदणींचा नवा टप्पा गाठला असून त्यात ११०० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही समावेश आहे.
या शिखर परिषदेच्या माध्यमातून या उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते तसेच नवोन्मेषकांना माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासोबत जोडून घेण्यासाठी, प्रस्थापित सहकार्यपूर्ण भागिदारी करण्यासाठी सर्वोत्तम जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी अत्यंत काटेकोर निवड प्रक्रियेचा अवलंब करत विविध ३२ स्पर्धांसाठी ७५० पेक्षा जास्त अंतिम विजेत्यांची निवड केली गेली आहे. या सर्व विजेत्यांना या स्पर्धेतील त्यांचे यश आणि स्वतःची प्रतिभा जगासमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, त्यांना आपल्या क्षेत्रातील आघाडीच्या व्यावसायिक तज्ञांसोबत संवाद साधण्याची, गुंतवणूकदारांसमोर संकल्पना मांडण्याची, तसेच मास्टरक्लास, निमंत्रितांची चर्चासत्रे, परिषदा या माध्यमातून जागतिक तज्ज्ञांकडून शिकण्याची संधीही मिळणार आहे. यातील ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ या आव्हानात्मक स्पर्धेच्या विजेत्यांना मुंबईत होणाऱ्या एका भव्य समारंभात ‘वेव्हज क्रिएटर अवॉर्ड ’ ने सन्मानित केले जाणार आहे.
