मुंबईत असा भेदभाव सुरू झाला! शाकाहारी व मांसाहारींसाठी पुनर्विकासात स्वतंत्र लिफ्ट?

मुंबई- मुंबईत गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असे वाद झडत आहेत. मांसाहारी लोकांना घरे नाकारण्यापर्यंत विकासकांची मजल गेली आहे. काहींच्या सणावेळी कत्तलखाना बंद करण्याच्या वादावरून मुंबई महानगरपालिकेत आणि राज्य विधिमंडळातही अनेकदा खडाजंगी झाली आहे. शाकाहारी आणि मांसाहारींमधील हा वाद मुंबईत किती टोकाला गेला आहे याचे ताजे धक्कादायक उदाहरण पश्चिम उपनगरांतील जोगेश्वरी येथून समोर आले आहे. जोगेश्वरीतील एका नियोजित इमारतीत शाकाहारी आणि मांसाहारींसाठी स्वतंत्र लिफ्ट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईतील शाकाहारी-मांसाहारी वाद प्रामुख्याने गुजराती, जैन समाज विरुद्ध मराठी समाज असा सुरू असतो. शाकाहारी असलेल्या या समाजांना आपल्या आसपास मांसाहारी मराठी माणूस नको आहे. त्यातून मराठी माणसांना सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये व इमारतीत घरे नाकारण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.
जोगेश्वरीत जाहीर झालेल्या एका पुनर्वसन प्रकल्पात शाकाहारी आणि मांसाहारींसाठी वेगळ्या लिफ्टची व्यवस्था करण्यात येणात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईत अशी योजना झाली तर यानंतरच्या अनेक प्रकल्पांतही असाच भेदभाव सुरू होईल.