मुंबईतील ७६ मतदान केंद्रे ‘दखलपात्र’ स्वरूपाची घोषित

मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई महापालिका हद्दीत एकूण १०,११७ मतदान केंद्रे आहेत.यापैकी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी तब्बल ७६ मतदान केंद्रे ही क्रिटीकल म्हणजेच दखलपात्र स्वरुपाची आहेत. या मतदान केंद्रावर १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान नोंदवले गेले आहे.तसेच अशी शहर भागात १३,तर उपनगरात ६३ मतदान केंद्रे आहेत.त्यापैकी सर्वाधिक ९ मतदान केंद्रे ही कुलाब्यातील नेव्हीनगर परिसरात आहेत,अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मतदान केंद्रावर १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होत असल्यास किंवा एखाद्या मतदान केंद्रावर एकाच उमेदवाराला ९० टक्क्यापेक्षा अधिक मतदान होत असल्यास ते मतदान केंद्र क्रिटीकल समजले जाते.याकरीता सहा विविध निकष आहेत.मात्र मुंबईत १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान या एकाच निकषानुसार तब्बल ७६ मतदान केंद्रे ही क्रिटिकल आहेत.कुलाब्यातील ९ क्रिटीकल मतदान केंद्रांपैकी बहुतांशी नौदलाच्या परिसरात आहेत. तसेच मुंबईच्या अन्य भागातील क्रिटीकल मतदान केंद्रांमध्येही नौदल किवा सैन्याच्या अखत्यारितील मतदान केंद्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे या परिसरात अनेकदा नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले नागरिक जास्त असतात.अनेक मतदार जहाजावर एक दोन महिन्यांच्या कालावधीकरीता गेलेले असतात.तर काही वेळा नौदलाच्या किंवा सैन्याच्या अखत्यारितील वसाहतींमध्ये निवडणूक निरीक्षकांना सुरक्षेच्या कारणास्तव सोडले जात नाही.अशा काही कारणांमुळे या परिसरात मतदान अतिशय कमी होत असल्याचे आढळून आले आहे.मुंबईतील या क्रिटीकल मतदान केंद्रांमध्ये कुलाबा- ९,वांद्रे पूर्व-९, चांदिवली- ७,दहिसर- ७, बोरिवली- ६,मागाठाणे- ५, विलेपार्ले – ६, घाटकोपर पश्चिम -५,मानखुर्द शिवाजीनगर-५ आदींचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top