मुंबईतील टँकर चालकांचा संप पाच दिवसांनी मागे


मुंबई
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला टँकरचालकांचा संप आज अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याबरोबर टँकर असोसिएशनच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत या संपावर तोडगा निघाला आहे. टँकर असोसिएशनने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. मुंबईतील पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टँकर असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी म्हणाले की, आमची काल रात्री मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली. त्यांनी भूषण गगराणी साहेबांशी बोलून घ्यावे असे सांगितले. त्यानुसार आज आयुक्तांबरोबर चर्चा झाली. आमच्यावर या आधी बजावण्यात आलेल्या नोटीसा मागे घेण्यात येणार असून नव्याने नोटिसा देण्यात येणार नाही. असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. या आधी करण्यात आलेली कारवाईही थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही हा संप मागे घेत आहोत. मुंबईकरांना ताबडतोब पाणी पुरवण्यात येईल.

मुंबईत टँकरचालकांवरील केंद्रीय भूजल प्रधिकरणाच्या नवीन नियमांमुळे अनेक निर्बंध आले होते. त्याच्या निषेधार्थ टँकरचालकांनी हा संप पुकारला. २०० मीटर परिसराची जागा, खाजगी संस्थेतर्फे फ्लो मीटर बसवण्याची सक्ती अशा नियमांविरोधात टँकरचालक बेमुदत संपावर गेले होते. त्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन संपाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याबरोबरची चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर आता केवळ मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी तोडगा काढण्याची भूमिका टँकरचालकांनी घेतली होती. काल महापालिकेने आपत्कालीन कलम लागू करुन मुंबईतील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा आपल्या ताब्यात घेतला होता. अखेर आज दुपारी झालेल्या बैठकीत याबाबत तोडगा निघाला.