मी भीत नाही! माफी मागणार नाही! कुणाल कामराची सडेतोड भूमिका

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून बोचरी टीका करणारा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने आज एक्स पोस्ट करून सरकारला पुन्हा डिवचले. मी मुळीच माफी मागणार नाही. मी कोणाला घाबरत नाही. कायदेशीर कारवाई करणार असाल तर सहकार्य करेन. पण तशीच कारवाई स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांवरही केली गेली पाहिजे. मी काहीही वावगे बोललो नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे बोलले तेच मी बोललो आहे, अशी सडेतोड भूमिका कामराने या पोस्टद्वारे मांडली.
माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मला असंख्य अनोळखी व्यक्तिंचे कॉल येत आहेत. ते कॉल माझ्या व्हॉईसमेलवर जातात. तिथे तुम्ही माझ्या ज्या गाण्याचा तिरस्कार करत आहात तेच गाणे तुम्हाला ऐकावे लागेल. या घटनेचे निःपक्षपातीपणे वार्तांकन करणाऱ्या काही प्रसार माध्यमांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत आपला देश 159 व्या क्रमांकावर आहे, असे म्हणत कामराने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर टोकदार भाष्य केले.
मला घटनेने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा वापर मी ताकदवान आणि धनाढ्य राजकारण्यांची स्तुती करण्यासाठी करावा, असे जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. बड्या नेत्यावर केलेला विनोद तुम्हाला पचत नसेल तर त्यामुळे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काडीचाही फरक पडत नाही. माझ्या माहितीप्रमाणे राजकीय नेत्यांवर व्यंग करणे हा काही गुन्हा ठरत नाही. मात्र मी गुन्हा केला असेल तर कायद्याने कारवाई करा. मी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र माझ्यावर जर कारवाई करणार असाल तर स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांवरही तशीच कारवाई करणार का, पूर्वसूचना न देता हातोडे घेऊन हॉटेलवर तोडक कारवाई करणाऱ्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणार का, हा माझा सवाल आहे. कदाचित मी माझा पुढचा कार्यक्रम एल्फिन्स्टन पुलावर करेन. हा पूल पाडण्याची गरज आहे, असा तिरकस टोलाही कामराने लगावला.
हॅबिटाट स्टुडिओची तोडफोड करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. तो स्टुडिओ माझ्यासारख्या अनेक कलावंतांचे केवळ एक व्यासपीठ आहे. कोणताही कलाकार काय बोलतो आणि कोणती भूमिका मांडतो याच्याशी स्टुडिओच्या व्यवस्थापनाचा दुरान्वयानेही संबंध नसतो. व्यवस्थापन आम्ही कलावंतांनी काय बोलावे काय बोलू नये हे ठरवू शकत नाही. कोणत्याही राजकीय पक्षालाही तसा हक्क नाही. हे म्हणजे बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो वाहून नेणारा ट्रक उलटवून लावण्यासारखे आहे, असा शेराही कामराने मारला.
हम होंगे कंगाल एक दिन
कामराचा नवा व्हिडिओ
माफी न मागण्याच्या पोस्टनंतर आज कुणाल कामराने आणखी एक व्हिडिओ शेअर केला. हम होंगे कंगाल एक दिन हे त्याने याआधीच तयार केलेले गाणे हॅबिटाट स्टुडिओतील तोडफोडीच्या व्हिडिओला जोडून त्याने हा नवा व्हिडिओ तयार केला आहे.
हम होंगे कंगाल, होंगे कंगाल
हम होंगे कंगाल, एक दिन
मन मे अंधविश्वास, देश का सत्यानाश
हम होंगे कंगाल एक दिन
होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर
पुलीस के पंगे चारो ओर, एक दिन
मन मे नथुराम, हरकत आसाराम
हम होंगे कंगाल एक दिन
होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हथियार
होगा संघका शिष्टाचार एक दिन
जनता बेरोजगार, गरीबी की कगार
हम होंगे कंगाल एक दिन…