मी एसटी कामगारांच्या पगारासाठी अजित पवारांच्या दारात जाणार नाही! शिंदे गटाचे मंत्री सरनाईकांच्या वक्तव्याने वाद


मुंबई- एसटी कामगारांना या महिन्याचा पूर्ण पगार देण्याऐवजी पगाराची केवळ 44 टक्केच रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला. उर्वरित पगार मंगळवारी देणार अशी आज घोषणा झाली असली तरी या पगारावरून शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाला आहे. एसटी कामगारांच्या पगारासाठी मी अजित पवारांच्या दारात जाऊन बसणार नाही, असे परिवहन मंत्री शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी म्हटल्याने राजकीय खळबळ उडाली. यावर सारवासारव करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र अजित पवार हे इतर पक्षाच्या खात्याना आवश्यक तो निधी देत नाहीत. ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आली.
एसटी कामगारांचा उर्वरित 44 टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळेल, अशी ग्वाही आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी कामगारांच्या उर्वरित पगारासंबंधी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. मात्र पगारासाठी आम्ही अर्थ खात्यासमोर दर महिन्याला जाऊन बसणार नाही. आम्ही 925 कोटी मागितले, पण 272 कोटीच दिल्याने पूर्ण पगार देता आला नाही, असे म्हणत सरनाईक यांनी अजित पवारांना
टोला लगावला.
मुंबई सेंट्रल आगारात आज परिवहन मंत्री सरनाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याप्रसंगी अजित पवारांना दोष देत ते म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही दर महिन्याच्या सात तारखेच्या आत झाला पाहिजे. ती जबाबदारी वित्त विभागाची आहे. आम्ही सरकारकडे भीक मागत नाही. आमचा हक्क मागत आहोत. या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून फक्त 272 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार देता आला नाही. या महिन्यात पाठपुरावा करून मंगळवारपर्यंत उर्वरित पगार दिला जाईल. मात्र असे वारंवार होऊ नये यासाठी मी दर महिन्याच्या पाच तारखेला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसणार आहे. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार गटाचे आनंद परांजपे म्हणाले की, अजित पवार कामगारांचा पगार कधीच थांबवणार नाहीत. जाहीरपणे बोलण्याआधी त्यांच्याशी बोलले असते तर बरे झाले असते. अजित पवार हे इतर पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी अडवतात असा आरोप मविआ सरकारमध्येही होत होता. आता पुन्हा हाच आरोप होत आहे .
आजच्या पत्रकार परिषदेत तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढीसाठीचे प्रयत्न आणि महामंडळाच्या भविष्यातील योजनांचीही सरनाईक यांनी माहिती दिली. महामंडळाच्या ताफ्यातील बऱ्याच बसगाड्या जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे 25 हजार नवीन बसगाड्यांची मागणी केली आहे. त्यांनी ती मागणी मान्य केली असून, दरवर्षी पाच हजार नव्या बस गाड्या महामंडळाला देण्याचे नियोजन आहे. जाहिरातीच्या माध्यमातून महामंडळाला मिळणारे उत्पन्न शंभर कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी काही प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.