भाईंदर- मीरा -भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे.या शिवाय मानधनावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील ३ हजार ८८४ ते २४ हजार ७१७ रुपये ह्या दरम्यान दिवाळी बोनस मंजूर केला गेला आहे.
महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी प्रशासकीय बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानावर ४ कोटी ४६ लाख ९३ हजारांचा होणार खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.महापालिकेतील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी व कर्मचारी असलेल्या १ हजार ४१० जणांना ; शिक्षण विभागातील १५१ शिक्षक व कर्मचारी यांना तसेच १५ सेवानिवृत्त अधिकारी यांना प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपये दिवाळी मिळणार आहे .
त्याचप्रमाणे ठोक मानधनावरील १२८ आशा लिंक वर्कर यांना प्रत्येकी ३ हजार ८८४ रुपये; वैद्यकीय विभागातील क्षयरोग, कृष्ठरोग,मलेरिया निर्मूलन आदी कामे करणाऱ्या १२८ जणांना प्रत्येकी १४ हजार २१२ रुपये ६४ संगणक चालक व लघुलेखक यांना १९ हजार ३२ रुपये; वैद्यकीय आरोग्य विभागातील ७० कर्मचाऱ्यांना १५ हजार ६३३ रुपये; ठोक मानधनवरील ४६ शिक्षकांना १२ हजार; सर्व शिक्षा अभियानातील २० कर्मचाऱ्यांना १९ हजार ३२ रुपये दिवाळी अनुदान मिळणार आहे.या शिवाय मानधनवरील अन्य कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी अनुदान मंजूर केले गेले आहे.