मुंबई –
दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजाराच्या पुनर्विकासाला स्थानिक रहिवाशांनीविरोध केला आहे. सेनापती बापट मार्गावरील या बाजाराचे हेरिटेज प्रकारात नूतनीकरण करण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. २०२४ मध्ये मांडण्यात आलेली ही योजना आता पुढे सरकली असून महापालिकेने नियोजन व डिझाइनसाठी सल्लागार वास्तुविशारदाची नेमणूक केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी या योजनेला वाहतूक, आरोग्य आणि नागरी नियोजनाच्या समस्यांचा दाखला देत विरोध केला आहे. ‘चकाचक दादर’ या सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही योजना रद्द करण्याची आणि बाजार हटवण्याची मागणी केली आहे. हा प्रकल्प कोणत्याही महत्त्वाच्या सर्वेक्षणाशिवाय आणि व्यवहार्यता तपासल्याशिवाय पुढे रेटला जात आहे. या प्रकल्पामुळे उद्भवणार्या पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल घेतली गेली नसल्याचे पत्रात म्हटले आहे.त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा आणि बाजार येथून शहराबाहेर हलवा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.