उरण – विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने आणि वातावरणातील उष्मा वाढत असल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे.यामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत.
करंजा,ससून डॉक,मोरा, कसारा आणि इतर अनेक बंदरांतून दररोज मासेमारीसाठी सुमारे ५०० ते ६०० बोटी समुद्रात रवाना होतात.मात्र या बंदरांतून मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींची संख्या अचानक वाढली आहे.परिणामी मासळीसाठी बर्फाचीही मागणी वाढू लागली आहे. खोल समुद्रातील मासेमारीसाठी बोटींना ८ ते १२ दिवसांचा कालावधी लागतो.एवढ्या दिवसांत पकडलेली मासळी ताजी ठेवण्यासाठी लागणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवत आहे.एका मासेमारी बोटीला एक ट्रिपसाठी १० ते १२ टन बर्फाची गरज भासते. २२०० रुपये प्रति टन दराने मच्छीमार बर्फ खरेदी करतात.
मुंबई,नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातून मच्छीमारांना मागणीप्रमाणे बर्फाचा पुरवठा केला जातो.कसारा बंदरातच ३५०-४०० मच्छीमार बोटींच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे मच्छीमारांची बर्फाची मागणीही वाढत चालली आहे.दुसरीकडे उष्माही वाढत चालल्याने आईस्क्रीम,शीतपेये, सरबतांसाठी बर्फाची मागणी वाढली आहे. त्यामुळे बर्फ पुरवठ्यावर मर्यादा आल्या असल्याचे बर्फ पुरवठादारांकडून सांगितले जात आहे.