Mark Zuckerberg : मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग सध्या एका पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी पाकिस्तानमध्ये आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यातआली होती असा दावा केला आहे. दक्षिण आशियामधील देशातील कायदेशीर लढाईबद्दल चर्चा करत असताना पाकिस्तानमधून त्यांना जीवघेण्या धमक्या मिळाल्या होत्या, असा खुलासा त्यांनी केला.
लोकप्रिय पॉडकास्ट होस्ट जो रोगनसोबतच्या मुलाखतीत झुकरबर्ग यांनी अनेक दावे केली. फेसबुकवर कोणीतरी पैगंबर मोहम्मद यांचे चित्र पोस्ट केल्यानंतर त्यांना मृत्यूची धमकी देण्यात आली होती, असा खुलासा केला.
एका खटल्याबाबत माहिती देताना झुकरबर्ग यांनी सांगितले की, वेगवेगळ्या देशांमध्ये काही कायदे आहेत, ज्यांच्याशी आमचे मतभेद आहेत. फेसबुकवर कोणीतरी पैगंबर मोहम्मद यांचे चित्र पोस्ट केले म्हणून पाकिस्तानमध्ये मला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांनी माझ्यावर खटला दाखल केला होता.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार हे ईशनिंदेचे प्रकरण होते व यामध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणानंतर सुरक्षेबाबत चिंता वाढली होती. मात्र पाकिस्तानला जाण्याचा कोणताही विचार नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
हा अनुभव थोडा अस्वस्थ करणारा होता. तुम्ही जर प्रवास करत असाल, तर तुमचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जावे असे वाटणार नाही, असेही ते मजेशीरपणे म्हणाले.