सोलापूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याविरोधात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज माथाडी कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे सोलापूरमधील कांदा लिलाव बंद पडला होता. यावेळी माथाडी कामगारांनी अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि चपलांचा हार घालून त्यांच्या विधानाचा निषेध केला. त्यामुळे पोलीस आणि कामगारांमध्ये झटापट झाली. तर माथाडी कामगारांनी कुठलीही पूर्व सूचना न देता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा उतरून घेणे व कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. जोपर्यंत लिलाव सुरू होणार नाही,तोपर्यंत रास्ता रोको सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला होता.
बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि माथाडी कामगरांमधील बैठक पार पडली. या बैठकीनंतर देखील माथाडी कामगार दिवसभर कामबंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाईल आणि या कांद्याचा उद्या सकाळी लिलाव नेहमीप्रमाणे पार पडेल ही माहिती माथाडी कामगार आणि बाजार समिती प्रशासनमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.