माऊलींचा संजीवन समाधी सोहळा! हेलिकॉप्टरने मंदिरावर पुष्पवृष्टीने

पुणे- ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम अशा जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. हेलिकॉप्टरने मुख्य मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त तीन दिवसांपासून आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाल्यामुळे अवघी आळंदी दुमदुमून गेली होती.
माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीन वाजता प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी १० वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन झाले. यावेळी विनामंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. त्यानंतर मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ – मृदुंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत विना मंडपातून कारंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करून ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला. त्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून माऊलींच्या समाधी मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top