महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त सेंट्रल पार्कच! बांधकाम नाही

मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

पालिकेचे तत्कालिन आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही याआधी या १२० एकर जागेवर पूर्णपणे उद्यान होईल.अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये जसे सेंट्रल पार्क आहे तसे मुंबई सेंट्रल पार्क तयार केले जाईल,असे सांगितले होते.महालक्ष्मी रेसकोर्सची २११ एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या ताब्यात होती. त्यातील १२० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात आली आहे.त्यामुळे पालिकेची ही १२० एकर आणि कोस्टल रोडची १७५ एकर जमीन अशा एकूण ३०० एकर जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. मात्र हे सेंट्रल पार्क उभारताना या जमिनीवर दुसरे कुठलेही खासगी बांधकाम होणार नाही,अशी भूमिका पालिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.