महाराष्ट्राला कुणाचे एटीएम बनू देऊ नका अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

अकोला – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग दुसर्‍या दिवशी महाराष्ट्रात प्रचारासाठी आले. त्यांनी अकोल्यातील प्रचार सभेत पुन्हा एकदा काँग्रेसवरच टीकेचा भडिमार केला. गांधी परिवाराचा उल्लेख शाही परिवार असा करत मोदी म्हणाले की, ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता येते ते राज्य शाही परिवाराला वाट्टेल तेव्हा पैसे देणारे एटीएम मशीन बनते. महाराष्ट्राला शाही परिवाराचे एटीएम बनू देऊ नका. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील मोदींची विदर्भातील ही पहिलीच सभा होती.
ते पुढे म्हणाले की काँग्रेसची सत्ता असलेली हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा ही राज्ये सध्या भाजपाची एटीएम बनली आहेत.शाही परिवारासाठी या राज्यांमधून कोट्यवधी रुपयांची वसुली केली जात आहे.महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तेलंगणा आणि कर्नाटकमधील मद्य व्यावसायिकांकडून 700 कोटींची वसुली केली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसने वेळोवेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यांच्या विरोधात कारस्थान करून त्यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यांचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला.जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करून एकमेकाशी लढण्यास काँग्रेसने नेहमीच चिथावणी दिली. दलित, शोषित, वंचित आणि आदिवासींची एकजूट होऊ देता कामा नये हेच काँग्रेसचे सुरुवातीपासूनचे सूत्र राहिले आहे. दलित जेवढा कमजोर होईल तेवढी काँग्रेस मजबूत होते आणि देश मजबूर होतो,अशा शब्दात मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काश्मीरमधील कलम 370 कलम रद्द करण्याच्या मुद्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने विधानसभेत 370 कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. कलम 370 कलम पुन्हा लागू करणे म्हणजे काश्मीरला पुन्हा दहशतवादाच्या आगीत लोटण्यासारखे होईल.बाबासाहेबांच्या संविधानाचा तो घोर अपमान ठरेल. भाजपाने मात्र नेहमीच बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाला सर्वोच्च स्थानी मानले. बाबासाहेबांचा जिथे जन्म झाला ते मध्य प्रदेशातील महू, नागपूरची दीक्षाभूमी, मुंबईतील चैत्यभूमी, दिल्लीतील निवासस्थान आणि लंडनमधील स्मारक या पाच पवित्र स्थळांना एकत्र जोडणारी पंचतिर्थ योजना आम्ही सुरू केली. कापूस उत्पादनासाठी ओळखल्या जाणार्‍या अकोला जिल्ह्यात मागील 70-75 वर्षांत कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आणले गेले नाहीत. उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी आजही आपली उन्नती साधू शकला नाही. हे चित्र बदलायचे असेल तर पुन्हा एकदा महायुती सरकारलाच निवडून द्या, असे आवाहन मोदी यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top