महाराष्ट्रात होणार देशातील पहिले एआय विद्यापीठ

सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) चर्चा आहे. अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढला आहे. या तंत्रज्ञानाविषयी भारतातील कॉलेज, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही माहिती व शिक्षण मिळणे आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देशातील पहिले एआय विद्यापीठ उभारले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती देण्यात आली होती.

 आता राज्यात देशातील पहिले एआय विद्यापीठ उभारण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहे. राज्य सरकारकडून यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विद्यापीठाची योजना व अंमलबजावणी संदर्भात शिफारस केली जाईल.

राज्य सरकारकडून एआय विद्यापीठ उभारण्यासाठी व अंमलबजावणी संदर्भात कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समावेश असणार आहे.

या विद्यापीठ स्थापने मागचे प्रमुख उद्दिष्ट महाराष्ट्राला AI शिक्षण आणि संशोधनात अग्रगण्य बनवणे हे आहे. एआय विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना आधुनिक AI तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाईल, ज्यामुळे महाराष्ट्राला AI क्षेत्रात वैश्विक ओळख मिळेल.